
अकोला, 30 मार्च (हिं.स.) : अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे पारंपरिक आणि भक्तीमय वातावरणात जयाजी महाराज यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र शुद्ध तिथीनिमित्त जयाजी महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची खास ओळख म्हणजे पाच बैलगाड्या एकाच वेळी ओढण्याची अनोखी पारंपरिक प्रथा. मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भाविक सात दिवस उपवास करून ही बैलगाड्या ओढतात. विशेष म्हणजे या बैलगाड्यांमध्ये तब्बल १०० ते १५० भाविक एकाच वेळी सहभागी होतात. यात्रेनिमित्त गावात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले असून, सासुरवाशीन मुली मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत आहेत. गावातील प्रत्येक घरामध्ये रोडग्याचा महाप्रसाद तयार केला जातो, ज्यामुळे गावात एकात्मतेचे दर्शन घडते.-----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे