शिरूर ताजबंदमध्ये श्री शंभो महादेव यात्रेला उत्साहात सुरुवात
लातूर, 30 मार्च (हिं.स.) : अहमदपूर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र शिरूर ताजबंद येथे चैत्रोत्सवानिमित्त श्री शंभो महादेव यात्रेला आजपासून अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. चैत्र शुद्ध एकादशीला यात्रेचा प्रारंभ झाला असू
यात्रा


लातूर, 30 मार्च (हिं.स.) : अहमदपूर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र शिरूर ताजबंद येथे चैत्रोत्सवानिमित्त श्री शंभो महादेव यात्रेला आजपासून अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. चैत्र शुद्ध एकादशीला यात्रेचा प्रारंभ झाला असून, स्वयंभू शंकराच्या महिमा आणि जाज्वल्य देवस्थानामुळे भाविक या भूमीला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखतात.

यात्रेनिमित्त गावात चैत्र पाडव्यापासूनच काठी-कावड बसण्याची परंपरा सुरू होते, तर मूळ रहिवासी व परिसरातील भाविक सलग १२ दिवस महादेवाचा कडक उपवास करतात. मंदिरात सन १९५४ पासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा चालत असून, या वर्षीही षष्ठीला सप्ताहाचा प्रारंभ झाला आहे. दररोज पूजा, आरती, कीर्तन, भजन, भागवत कथा आणि रामायण पठण या धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

सोमवारी मध्यरात्री १२ वाजता श्री शिव-पार्वती विवाह सोहळा झाल्यानंतर मंगळवारी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या विकासात राज्याचे सहकार मंत्री आणि मंदिर कमिटीचे अध्यक्ष ना. बाबासाहेब पाटील तसेच सर्व कार्यकारी मंडळाचा मोठा सहभाग आहे. माजी मंत्री बाळासाहेब जाधव, कै. भगवानराव पाटील, कै. काशिनाथराव पाटील, कै. गोविंदराव भोसले, कै. गोविंदराव पडोळे यांचे परिवार आणि ग्रामस्थही या परंपरेला चालना देत आहेत.

तत्कालीन खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांनी दिलेल्या निधीतून आणि बालाजी पडोळे, गणेश कापसे यांच्या सहकार्यात येथे भव्य ‘शिवपार्वती मंगल कार्यालय’ व सभागृह उभारण्यात आले. अध्यक्ष ना. पाटील यांनी मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला असून विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत.

येथील तीर्थकुंड आणि स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात व यात्रा काळात राज्यभरातून भाविक येतात. पंढरपूर, देहू, आळंदी, शिर्डी आणि कपिलधारकडे जाणाऱ्या शेकडो दिंड्यांचा येथे मुक्काम असतो. बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाइतकीच गर्दी येथे पाहायला मिळते. सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या सहकार्याने पार पडणारा हा यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी संपन्न होणार आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande