पालघरमध्ये उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात
पालघर, 30 मार्च (हिं.स.) : जिल्हा परिषद पालघरमार्फत गोवर्धन इको व्हिलेज, गालतरे येथे आरोग्य, शिक्षण तसेच महिला व बालविकास विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. विविध संवर्गातील आदर्श आश
आरोग्य, शिक्षण व महिला-बालविकास कर्मचाऱ्यांचा भव्य सन्मान;


पालघर, 30 मार्च (हिं.स.) : जिल्हा परिषद पालघरमार्फत गोवर्धन इको व्हिलेज, गालतरे येथे आरोग्य, शिक्षण तसेच महिला व बालविकास विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. विविध संवर्गातील आदर्श आशा पर्यवेक्षिका, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार वितरणात शिक्षण विभागांतर्गत प्रत्येक तालुक्यातून एक अशा एकूण आठ जणांना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त उमेश खिराडे, महादेव इरकर व आनंद आन्नेमवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा कोटबी बुजडपाडा येथील शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.

महिला व बालविकास विभागांतर्गत १२ प्रकल्पांमधून प्रत्येक प्रकल्पासाठी एक मुख्य सेविका, तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या सेविका आणि मदतनीस अशा एकूण सहा जणांना प्रति प्रकल्प पुरस्कार देण्यात आले.

आरोग्य विभागांतर्गत आशा कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय सहा व तालुकास्तरीय २४ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कारांतर्गत पाच संवर्गांमध्ये १५ जणांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रत्येक तालुक्यातील १३ संवर्गांमधून प्रत्येकी एक अशा एकूण १०४ कर्मचाऱ्यांचा आणि जिल्हास्तरीय सहा कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आपल्या भाषणात शिक्षक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका हे प्रशासनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगितले. त्यांच्या सातत्यपूर्ण व निष्ठावान कार्यामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळत असून समाजाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande