कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणेचा आढावा; डॉ. दीपक सावंत यांची पालघर जिल्ह्यात पाहणी
पालघर, 30 मार्च (हिं.स.)। कुपोषण निर्मूलनासाठी राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) डॉ. दीपक सावंत यांनी नुकताच पालघर जिल्ह्यात विविध आरोग्य संस्थांना भे
कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणेचा आढावा


पालघर, 30 मार्च (हिं.स.)।

कुपोषण निर्मूलनासाठी राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) डॉ. दीपक सावंत यांनी नुकताच पालघर जिल्ह्यात विविध आरोग्य संस्थांना भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा अंतर्गत उपकेंद्र आंबेघर येथे त्यांनी भेट देऊन गरोदर माता, बालमृत्यू व कुपोषित बालकांबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वैदेही तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान त्यांनी आरोग्य सेवांबाबत आवश्यक सूचना देत कुपोषण निर्मूलनासाठी अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर डॉ. सावंत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सायवन, ता. डहाणू येथे भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. या भेटीत त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधत सेवा सुविधांबाबत माहिती घेतली. तसेच कुपोषण निर्मूलन, माता-बाल आरोग्य व कुटुंब कल्याणाशी संबंधित कामकाजाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. राजकुमार जगताप (सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा – कुटुंब कल्याण, पुणे), डॉ. मनिष रेंघे, डॉ. संतोष चौधरी (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. शशिकांत साळुंखे (सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. वैदेही माळवी (जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी), डॉ. रुग्वेद दुधाट (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. युवराज राजमाने, डॉ. महेंद्र नवरे तसेच सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. याच दिवशी जिल्हा परिषद पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आमदार राजेंद्र गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या बैठकीत कुपोषण निर्मूलनासंदर्भातील उपाययोजना, जिल्ह्यातील सद्यस्थिती व पुढील नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande