नाशिक - अंदाजपत्रकीय महासभेत गोंधळ; विरोधकांकडून महापौरांचा ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न
सत्ताधारी भाजपा -राकपा मधील मतभेद उघड नाशिक, 30 मार्च (हिं.स.)। - महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेमध्ये स्मारकासाठी तरतूद तसेच निधीमध्ये असलेल्या तफावती यावरून सत्ताधारी भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि उद्ध
नाशिक - अंदाजपत्रकीय महासभेत गोंधळ; विरोधकांकडून महापौरांचा ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न


सत्ताधारी भाजपा -राकपा मधील मतभेद उघड

नाशिक, 30 मार्च (हिं.स.)।

- महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेमध्ये स्मारकासाठी तरतूद तसेच निधीमध्ये असलेल्या तफावती यावरून सत्ताधारी भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी मोठा गदारोळ घातला यावेळी महापौरांचा राजदंड पळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला परंतु सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न हाणून पाडला या गोंधळामुळे अंदाजपत्रकीय महासभा चांगलीच वादळी ठरली . दरम्यान या महासभेमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्व अलबेला असल्याचा जो दावा केला जात होता तो पूर्णपणे खोटा असल्याचे देखील समोर आले सत्ताधारी भाजपा आणि मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील मतभेद देखील उघड झाले आहे

नाशिक महानगरपालिकेचा सन 2026 - 2027 चा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या वतीने सादर करण्यात येणार होता त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेच आज (सोमवारी) आयोजन करण्यात आले होते. या महासभेमध्ये विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या सिडकोतील स्मारकासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, निधीच्या तफावतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही पोस्टरबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काही विरोधी नगरसेवकांनी महापौरांचा ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. प्रशासन आणि सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे काही काळासाठी सभा स्थगित करण्यात आली होती. यानंतर परिस्थिती निवळल्यावर सभा पुन्हा सुरू करण्यात आली. या प्रकारामुळे सभागृहाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले.

ठाकरे आणि अजित पवार गटाचे नगरसेवक आक्रमक

महापालिकेत समान निधी वाटप होत नसल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पोस्टर हातात घेत सभागृहात घोषणाबाजी केली. यावेळी ‘विरोधकांना निधी अर्धा देत असाल तर नागरिकांचा कर देखील अर्धा करा’, जनतेच्या पैशात भेदभाव आम्हाला मान्य नाही, मनपाची मनमानी चालणार नाही, अशा आशयाचे पोस्टर झळकावत निषेध केला. तर अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी अजित पवारांच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी केली.

यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला समर्थन देणारे अपक्ष नगरसेवक आणि भाजपाचे तिकीट नाकारलेले मुकेश शहाणे यांनी याबाबत निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती त्यांनी तसे पत्रही दिले होते हे सर्व असताना देखील अंदाजपत्रकाच्या पुस्तकांमध्ये याबाबत तरतूद दिसून आल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांना जो घेरण्याचा प्रयत्न केला तो बघितल्यानंतर सत्ताधारी भाजपा आणि अजित पवार च्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल आहे हा जो देखावा उभा केला जात होता तो पूर्णपणे खोटा असल्याचे देखील समोर आले आहे

चौकट

मूळ अंदाजपत्रक सादर

सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी रुपये १४३.०९ कोटी आरंभिच्या शिल्लकीसह रुपये ३४६९.१३ कोटी जमेचे व रुपये ३४६७.२८ कोटी खर्चाचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी महासभेत सादर करण्यात आले

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande