
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथील कृषी महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्याची घोषणा झाली; तरीही सरकारमधील काही नेत्यांचा विरोध असल्याचा गौप्यास्फोट संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केला.
त्यावेळी आजीवन सभासदांनी शिक्षण व इतरही मुद्यांवरून अध्यक्ष व संचालकांना घेरण्याचा प्रयत्न केला. काही शाळांचा दर्जा खालावला असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. त्यामुळे अध्यक्षीय भाषण करताना हर्षवर्धन देशमुख यांनी संस्थेच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. त्यावेळी हर्षवर्धन देशमुख म्हणाले, की पापळ येथील कृषी महाविद्यालयाला कुणाचा विरोध होता, हे सांगणे आता संयुक्तिक नाही; मात्र येत्या काळात या महाविद्यालयाला अनुदानित करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केल्या जाईल. त्यासाठी शासनस्तरावर बोलणी सुरू आहे. त्यासाठी कोणताही खर्च न करता केवळ जागा आणि नियोजनासाठी शासनाकडून संस्थेला जवळपास सव्वा कोटी रूपयांचे अनुदान मिळाले आहे. विशेष म्हणजे पुढील विज्ञान प्रदर्शनही शिवाजी संस्थेच्याच यजमानपदाखाली नागपुरात होणार असून, त्यासाठीही जवळपास तेवढेच अनुदान मिळणार आहे. त्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर यांचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी