
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : अमरावती शहर व जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक पंपांवर अनावश्यक गर्दी झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी केली.
जिल्हा प्रशासनाने अग्रसेन पेट्रोल पंप, आयटीआय कॉलेजजवळील पेट्रोल पंप तसेच राजेश व विदर्भ गॅस एजन्सींची प्रत्यक्ष पाहणी केली असता सर्व ठिकाणी पेट्रोल, डिझेल व गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आढळले.नागरिकांच्या सोयीसाठी पेट्रोल पंप व गॅस एजन्सी चालकांना पिण्याचे पाणी, शेड व बसण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की, घाबरून इंधनाचा साठा करू नये, पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून प्रशासन इंधन पुरवठ्यावर सतत लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनी हि त्यांनी यावेळी केले
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी