जिल्हा परिषद सभापती निवड : माने, गोडभरले, बिरादार, गोरे यांची बिनविरोध निवड
लातूर, 30 मार्च (हिं.स.) : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील चार सभापतींच्या निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. लातूर जिल्हा परिष
सभापती निवड


लातूर, 30 मार्च (हिं.स.) : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील चार सभापतींच्या निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

लातूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतिपदी राष्ट्रवादी (अजित पवार)चे उत्तम माने, महिला व बालकल्याण सभापतिपदी भाजपच्या शिवकन्या गोडभरले यांची तर उर्वरित दोन विषय समिती सभापतिपदी राष्ट्रवादी (अजित पवार)चे ज्ञानेश्वर बिरादार आणि भाजपच्या कविता गोरे यांची सोमवारी दुपारी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर फटाके फोडून, गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील चार सभापतींच्या निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजकल्याण सभापतिपदासाठी महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार)चे शिरूर ताजबंदचे उत्तम माने यांनी तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे लोहारा गटातील मुकेश भालेराव यांनी उमेदवारी दाखल केली होती. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी महायुतीतील भाजपच्या खरोळा गटातील शिवकन्या गाेडभरले यांनी तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या औराद शहाजानी गटातील योगिता जाधव यांनी अर्ज दाखल केला होता.

उर्वरित दोनपैकी एका विषय समिती सभापतिपदासाठी महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार)चे तोगरी गटातील ज्ञानेश्वर बिरादार यांनी तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे एकुर्गा गटातील दत्तात्रय टेकाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दुसऱ्या विषय समिती सभापतिपदासाठी महायुतीतील भाजपच्या सरवडी गटातील कविता गोरे यांनी तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे खरोसा गटातील तानाजी जाधव यांनी उमेदवारी दाखल केली होती. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज मागे...सर्व नामनिर्देशनपत्र छाननी वैध ठरले. उमेदवारी मागे घेण्याच्या वेळेत काँग्रेसच्या चारही इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे चारही सभापतींच्या बिनविरोध निवडी झाल्याचे पीठासन अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी जाहीर केले. त्यांना तहसीलदार सौदागर तांदळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, गटविकास अधिकारी संतोष माने यांनी साहाय्य केले.

नूतन पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाने केले स्वागत...नूतन सभापती माने, गोडभरले, बिरादार आाणि गोरे यांचे पीठासन अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी यांची उपस्थिती होती.

सर्व मतदारसंघांना दिली सत्तेची संधी...जिल्हा परिषद अध्यक्षपद हे निलंगा तर उपाध्यक्षपद हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाकडे देण्यात आले. आता सभापती निवडीत अहमदपूर, उदगीर, लातूर ग्रामीण, औसा मतदारसंघास प्राधान्य देण्यात आले आहे. सभापतिपदाच्या माध्यमातून समतोल राखण्याचा प्रयत्न नेतेमंडळींनी केला आहे.

संजय बनसोडे यांनी केले स्वागत...नूतन सभापतींचा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी जिल्हा परिषदेत सत्कार करून स्वागत केले. लोकाभिमुख कार्य करून लौकिक वाढवावा, असा सल्लाही दिला.

बिरादार यांना बांधकाम, गोरे यांना कृषी सभापतिपद?...जिल्हा परिषदेतील बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतींच्या दालनात राष्ट्रवादी (अजित पवार)चे नूतन सभापती ज्ञानेश्वर बिरादार यांचा तर कृषी व पशुसंवर्धन सभापतींच्या दालनात भाजपच्या कविता गाेरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे बांधकाम सभापतिपदी बिरादार आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदी गाेरे यांची आजच निवड झाली की काय? असा सवाल उपस्थित होत होता.

नियमानुसार आगामी सर्वसाधारण सभेत बांधकाम, कृषी व पशुसंवर्धनसह अन्य खाते वाटप वाटप होणार आहे.-उषाबाई पाटील, अध्यक्ष

नेतेमंडळींच्या धोरणानुसार बिरादार यांचा बांधकाम तर गोरे यांचा कृषी खात्याच्या कक्षात सत्कार होत आहे.रामचंद्र तिरुके, गटनेते, भाजप

पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार बांधकाम सभापतिपद बिरादार यांना संधी देण्यात आली आहे.-प्रा. दिलीपकुमार मटके, गटनेते, राष्ट्रवादी (अजित पवार).

पीठासन अधिकाऱ्यांचा मोबाइल गायब...

पीठासन अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांचा निवडी प्रक्रियेदरम्यान सभागृहातून मोबाइल गायब झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande