
जळगाव, 30 मार्च (हिं.स.) जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी येणाऱ्या अर्जदारांची तपासणी ही यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील दिव्यांग मंडळ (Handicap Board) मार्फत दर बुधवारी करण्यात येत होती. मात्र दिव्यांग व्यक्तींना होणारी गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने आता हा निर्णय बदलण्यात आला असून अधिष्ठाता यांनी दिव्यांग मंडळाची तपासणी दर सोमवार ते शुक्रवार या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग विभागाकडून भ्रमणध्वनीद्वारे संदेश (SMS) प्राप्त होईल, त्यांनी त्या संदेशात नमूद केलेल्या तारखेस उपस्थित राहावे, जेणेकरून त्यांची तपासणी वेळेत व सोयीस्कर पद्धतीने करता येईल. तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्व तपासणीसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील दिव्यांग मंडळ विभागात उपस्थित राहावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर