दिव्यांग कल्याण योजनांचा जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
जळगाव, 30 मार्च (हिं.स.) जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत दिव्यांग कल्याणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस म
र विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण


जळगाव, 30 मार्च (हिं.स.) जिल्हा दिव्यांग समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत दिव्यांग कल्याणाशी संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगोळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, नगरपालिका सह आयुक्त जनार्दन पवार, दिव्यागं सक्षमीकरण अधिकारी पद्मनाभ म्हस्के तसेच संबधीत विविध दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जि.प. सेस २०२५-२६ अंतर्गत दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त कर्णबधीर विद्यालयांमधील ३४६ विद्यार्थ्यांना एकूण ६९२ कर्णयंत्रांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमासाठी सुमारे ५३ लाख रुपये खर्च करण्यात आला असून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या शिक्षणात व दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत करणे हा आहे. बैठकीत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) च्या कार्यप्रणालीचा तसेच उद्भवणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. याशिवाय यूडीआयडी (UDID) कार्ड वितरणाची सद्यस्थिती, प्रलंबित अर्ज व त्याच्या गतीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यूडीआयडी प्रमाणपत्र पडताळणीची स्थितीही तपासण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडील दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधीच्या खर्चाचा आढावा, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत १ टक्के निधी व विविध विकासकामांची माहिती बैठकीत देण्यात आली. मर्यादित व कायदेशीर पालकत्व प्रकरणे, शासकीय इमारतींमध्ये सुगम्यता (Accessibility) सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी समावेशक व सशक्त समाज निर्मितीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागांनी प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी बैठकीत दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande