
रायगड, 30 मार्च (हिं.स.) : परीक्षांचा हंगाम संपताच रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अक्षरशः लाट उसळली आहे. अलिबाग, किहीम, मुरूड आणि दिवेआगर हे किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. मात्र, गॅस टंचाई आणि प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचा आनंद हिरावला जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची चाहूल लागताच कुटुंबे, मित्रपरिवार आणि तरुणाई मोठ्या संख्येने किनाऱ्यांकडे धाव घेत आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर तुफान गर्दी, हॉटेल्स फुल्ल आणि पार्किंगसाठी जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या गर्दीतच मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सर्वात मोठा फटका गॅस टंचाईचा बसत आहे. अनेक हॉटेल्स आणि खानावळींना स्वयंपाक करणे कठीण झाले असून काही ठिकाणी हॉटेल्स बंद ठेवावी लागत आहेत. तर काही ठिकाणी ‘मर्यादित मेन्यू’वरच पर्यटकांची व्यवस्था केली जात आहे. परिणामी, जेवणासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून पर्यटक संताप व्यक्त करत आहेत.
यातच रस्त्यांची दुरवस्था आणि सुरू असलेली कामे ही समस्या अधिक गंभीर बनवत आहेत. अलिबाग आणि मुरूड परिसरात रस्त्यांचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. अरुंद रस्ते, लांबच लांब वाहनांच्या रांगा आणि तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले पर्यटक – असा त्रासदायक अनुभव अनेकांना येत आहे.
एकीकडे समुद्रकिनाऱ्यांची नैसर्गिक सुंदरता पर्यटकांना आकर्षित करत असली, तरी दुसरीकडे गॅस टंचाई आणि ट्रॅफिक कोंडीमुळे “सुट्टी की सजा?” असा सवाल पर्यटक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, हॉटेल व्यावसायिकांनी गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अन्यथा पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)