
रायगड, 30 मार्च (हिं.स.) :“हर घर जल”चा गाजावाजा करणाऱ्या जलजीवन योजनेचे रायगड जिल्ह्यातील वास्तव धक्कादायक समोर आले आहे. तब्बल 106 कोटी रुपयांच्या निधीअभावी 607 योजना अर्धवट पडून आहेत. कोट्यवधी रुपये खर्चूनही अनेक गावांमध्ये पाण्याचा थेंब मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत विहिरी, पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या आणि घरगुती नळजोडणीची कामे करण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी ही कामे निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत. टाक्यांना तडे जाणे, पाईपलाईन तुटणे, तसेच काही ठिकाणी ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडल्याचे आरोपही पुढे येत आहेत.
जिल्ह्यात एकूण 1,496 योजना मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी केवळ 889 योजना पूर्ण झाल्या असून 607 योजना अद्याप प्रलंबित आहेत. म्हणजेच सुमारे 40 टक्के कामे रखडलेली आहेत. काही योजना 95 टक्क्यांपर्यंत पूर्ण होऊनही निधीअभावी थांबल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे.
दरम्यान, जानेवारीपासून जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. अनेक गावांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी नागरिकांना 10 ते 15 दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. “जलजीवनच्या आडात पाणीच नाही” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कोट्यवधींचा निधी खर्चूनही प्रतिमाणसी 55 लिटर पाण्याचा दावा हवेतच विरला असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता तरी शासन आणि जिल्हा परिषद प्रशासन जागे होणार का, की रायगडकरांना पाण्यासाठी अशीच वणवण सहन करावी लागणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)