
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल रोजी अचलपूर तालुक्यातील सर्व मद्यविक्री दुकाने एक दिवसासाठी बंद ठेवण्यात यावीत, अशी ठाम मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. अचलपूर तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह भव्य मिरवणुका आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो.
अशा गर्दीच्या आणि उत्सवी वातावरणात सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे काँग्रेसने निवेदनात स्पष्ट केले आहे. मद्यपानामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता, कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी १४ एप्रिल रोजी सर्व दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या मते, या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि आंबेडकर जयंती उत्सव शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यास मदत होईल.
निवेदन सादर करताना परवाडा शहराध्यक्ष राहुल गवई, तालुका ग्रामीण अध्यक्ष नामदेव तनपुरे, सेवादल अध्यक्ष सचिदानंद बेलसरे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष राहुल गाठे यांच्यासह विशाल खानझोडे, पृथ्वीराज गजभिये, बाबाराव इंगोले, अमोल कविटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी