
लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा द्या - महापौर हिमगौरी आहेर-आडके चे आवाहन
नाशिक, 30 मार्च (हिं.स.)।
- अखिल भारतीय मराठा महासंघ व 'मराठा सोयरीक' यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात भव्य वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नाशिकसह जळगाव, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि बीड यांसारख्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या २१० युवक आणि ६५ युवतींनी आपल्या पालकांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री. प्रवीण रमेश जाधव, सागर भाऊसाहेब लामखेडे आणि सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक श्री. प्रभाकर रायते उपस्थित होते.
मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थित पालकांना आणि युवक-युवतींना मार्गदर्शन करताना महापौर हिमगौरी आडके म्हणाल्या की, सध्याच्या काळात लग्नांमध्ये होणारा अवाढव्य खर्च ही चिंतेची बाब आहे. विशेषतः मुलींच्या पालकांना या खर्चापायी अनेकदा कर्जबाजारी व्हावे लागते. हा विनाकारण होणारा खर्च टाळून तो पैसा मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा त्यांच्या व्यवसायासाठी गुंतवणे काळाची गरज आहे.त्यांनी पुढे नमूद केले की, आजच्या बदलत्या काळात विवाहबंधनाकडे पाहण्याचा तरुण पिढीचा दृष्टिकोन बदलला असून, पालकांनीही काळानुसार आपल्या विचारात बदल करणे आवश्यक आहे. नगरसेवक प्रवीण रमेश जाधव यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करून वधू-वर मेळाव्यांच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV