
जळगाव,, 30 मार्च (हिं.स.)मेरा युवा भारत, जळगाव यांच्या वतीने युवक कार्यक्रमांसाठी जिल्हा सल्लागार समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला. यामध्ये महत्त्वपूर्ण दिवस व सप्ताह आयोजन, फ्लॅगशिप योजनांवरील कार्यशाळा, “एक पेड़ माँ के नाम” विशेष उपक्रम, सरदार@150 एकता मार्च, क्लस्टर स्तर क्रीडा स्पर्धा, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा (अस्मिता लीग), आंतरराष्ट्रीय महिला दिन, युवा क्लब विकास कार्यक्रम, आंतरजिल्हा युवा देवाण-घेवाण कार्यक्रम (मुंबई–जळगाव), विकसित भारत युवा संसद तसेच बजेट क्वेस्ट जनजागृती कार्यक्रम आदी उपक्रमांचा समावेश होता. डॉ. हारकर यांनी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या समन्वयाने युवा क्लब स्थापन करण्याचे निर्देश दिले. तसेच या युवा क्लबमध्ये मुलींचे नेतृत्व वाढावे यासाठी अध्यक्षपदावर मुलींची निवड करण्यावर त्यांनी भर दिला. यासोबतच HPV लसीकरणाबाबत जनजागृती, प्लास्टिकमुक्त अभियान तसेच नायलॉन मांजा विरोधी जनजागृती हे उपक्रम युवा क्लब, NSS व NCC यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना डॉ. हारकर यांनी दिल्या. या बैठकीस एनएसएस जिल्हा समन्वयक डॉ. आर. एस. गवारे, कौशल्य विकास व रोजगार अधिकारी ए. आर. तडवी, एनसीसी प्रतिनिधी सुरेश कुमार, जिल्हा क्रीडा कार्यालयातील राज्य प्रशिक्षक श्रीमती मीनल थोरात उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर