
पालघर, 30 मार्च (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात असले, तसेच चालकांना नियमित प्रशिक्षण दिले जात असले तरी अपघातांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. पालघर जिल्ह्यात मागील वर्षभरात एसटीच्या सुमारे १०० अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे ९९ जण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे एसटी प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. चालकांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येते, तसेच सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांचा गौरवही केला जातो. पाच, दहा, पंधरा, वीस आणि पंचवीस वर्षे अपघातमुक्त सेवा देणाऱ्या चालकांना ‘सुरक्षित सेवा बिल्ला’ देऊन सन्मानित करण्यात येते.
तथापि, काही अपघात मानवी चुका तसेच बाह्य कारणांमुळे घडत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तरीही अपघातांची संख्या कमी करण्यासाठी अधिक प्रभावी आणि कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी एसटी प्रशासनाने उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL