
पालघर, 30 मार्च (हिं.स.) : गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श ग्रामसेवक, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी तसेच वनराई पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषद पालघरच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला राजेंद्र गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत यांसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या नियोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वनराई उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान पाच बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत अनेक ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी केली. चहाडे ग्रामपंचायतीने सर्वाधिक १५ बंधारे उभारले, तर भाताणे, आडणे व बऱ्हाणपूर ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १२ बंधारे उभारून विशेष कामगिरी केली. या उपक्रमांतर्गत एकूण ३८ ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याशिवाय, आदर्श ग्रामसेवक (सन २०२२-२३ व २०२३-२४) तसेच आदर्श ग्रामपंचायत अधिकारी (सन २०२४-२५) पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. गेल्या काही वर्षांतील प्रलंबित पुरस्कार यावेळी वितरित करण्यात आल्याने संबंधितांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करत जिल्ह्यातील कोणताही नागरिक जात, धर्म किंवा पक्षभेद न पाहता वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी असे स्पष्ट केले. वनराईसारख्या उपक्रमांमुळे जलसंधारणाला चालना मिळून ग्रामीण विकास अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तर राजेंद्र गावित यांनी ग्रामविकासासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आपल्या प्रतिपादनात सांगितले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL