
- श्रुती म्हात्रे यांच्या इशाऱ्यानंतर व्यवस्थापन सक्रिय; निर्णय महिन्यात
रायगड, 30 मार्च (हिं.स.)। रसायनी येथील लोना इंडस्ट्रीज लि. मधील कंत्राटी कामगारांच्या न्यायहक्काच्या लढ्याला अखेर सकारात्मक दिशा मिळाली आहे. कंपनी व्यवस्थापनाने एक महिन्याच्या आत ठोस निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनी व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे कामगार वर्गाकडून स्वागत करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध कंत्राटदारांमार्फत सेवा देणाऱ्या कामगारांना कंपनीच्या थेट पे-रोलवर घेण्यात यावे, तसेच शासन नियमानुसार वेतनवाढ व मूलभूत सुविधा मिळाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी कोकण श्रमिक संघाच्या वतीने साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. तब्बल १७ ते १८ वर्षे सेवा बजावूनही न्याय मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी होती.
दि. ३० मार्च २०२६ रोजी कंपनी गेटसमोर आंदोलनाची ठिणगी पडण्याआधीच पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या उपस्थितीत कामगार नेत्या श्रुती म्हात्रे व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात सुमारे २ ते ३ तास सखोल चर्चा झाली.
या चर्चेत २२ कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघाला असून, टप्प्याटप्प्याने सर्व कामगारांना कायमस्वरूपी करण्यासह वेतनवाढ व इतर सुविधा देण्याचे लेखी आश्वासन कंपनीने दिले आहे.
दरम्यान, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “जर कंपनीने आश्वासनाची पूर्तता केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आवश्यक असल्यास आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्यासही मागेपुढे पाहणार नाही.”
या आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कामगारांना पाठिंबा दिला. संघर्षाच्या या टप्प्यावर कामगारांच्या ऐक्याची ताकद अधोरेखित झाली.
कामगार प्रतिनिधी सचिन मते यांनी प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाने संवादाची दारे उघडी ठेवून न्याय मिळवून देण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.
या आंदोलनात सरपंच रंजना विश्वनाथ गायकवाड, माजी पं. समिती सदस्य जगदीश पवार, माजी उपसरपंच रिया माळी, मालती वाघमारे, माजी सरपंच शिवाजी माळी, संतोष वाघमारे, संदीप दळवी, विनायक भोईर, संदेश मते आदी मान्यवर उपस्थित होते.
कामगारांच्या हक्कासाठी सुरू असलेला हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)