
पुणे, 30 मार्च (हिं.स.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील दिरंगाई आणि पुनर्मूल्यांकनासाठी लागणारा प्रदीर्घ वेळ आता लवकरच कमी होण्याची चिन्हे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली ‘ऑनस्क्रीन मूल्यांकन’ पद्धत विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा अजेंड्यावर घेतली असून, लवकरच प्रायोगिक तत्त्वावर तिची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्याबरोबरच निकाल प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या दुसऱ्या दिवशी पुनर्मूल्यांकनाच्या मुद्द्यावरून प्रशासनाला सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अधिसभा सदस्य ईशानी जोशी यांनी उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीस होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
यावर उत्तर देताना प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी वाढती स्वायत्त महाविद्यालये आणि शिक्षकांच्या उपलब्धतेअभावी पुनर्मूल्यांकन प्रक्रिया अधिक कठीण झाल्याची कबुली दिली. मनुष्यबळाच्या मर्यादा लक्षात घेऊन आता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नव्या आराखड्यानुसार, परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्या ‘क्लाउड’वर संग्रहित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना घरबसल्या ऑनलाइन उत्तरपत्रिका पाहता येणार आहेत. या उपक्रमामुळे निकाल प्रक्रियेला वेग येण्याची आणि विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु