अकोला: हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी डिजिटल शेतीशाळा अभियान
अकोला, 30 मार्च (हिं.स.) : हवामानातील अनिश्चितता, पावसाचा अपुरेपणा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च सतत वाढत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महाराष
अकोला: हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी डिजिटल शेतीशाळा अभियान


अकोला, 30 मार्च (हिं.स.) : हवामानातील अनिश्चितता, पावसाचा अपुरेपणा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च सतत वाढत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महाराष्ट्र राज्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान सुरू करत आहे.

हे अभियान शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीतही उत्पन्नाची हमी देणे यासाठी राबविण्यात येत आहे. यामध्ये कृषी विभागाबरोबरच कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग इत्यादी संस्थाही सहभागी आहेत. अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात चार डिजिटल शेतीशाळा आयोजित केल्या जात आहेत. या शाळांमध्ये राज्यातील सर्व प्रकारच्या पीक पद्धतींसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची माहिती कृषी तज्ञ, प्रगतशील शेतकरी व विद्यापीठे यांच्याकडून दिली जाईल.

विशेष डिजिटल शेतीशाळांचे वेळापत्रक व विषय:

शेतीशाळा १ (१ एप्रिल २०२६) – पेरणीपूर्व तंत्रज्ञान: बेड तयार करणे, शून्य/कमी मशागत, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया

शेतीशाळा २ (८ एप्रिल २०२६) – जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन: बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती

शेतीशाळा ३ (१५ एप्रिल २०२६) – एकात्मिक कीड व्यवस्थापन: सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटक संवर्धन, लिंबोळी व दशपर्णी अर्क वापर

शेतीशाळा ४ (२२ एप्रिल २०२६) – भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र: थेट पेरणी (DSR), श्री पद्धत, यांत्रिकी भात लावणी

सर्व शेतीशाळा संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील आणि यांचे लाइव्ह (LIVE) प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाउंडेशन आणि उमेदच्या युट्युब चॅनेलवर केले जाईल.

कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाने शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे आणि फार्मर कप स्पर्धेत भाग घेणारे सर्वांना मोठ्या संख्येने या डिजिटल शेतीशाळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande