
चाईल्डलाइन आणि स्वयंसेवी संस्थांची धाडसी कारवाई
अकोला, 30 मार्च (हिं.स.) : बार्शीटाकळी नजीकच्या गावात एका अल्पवयीन मुलीचा बनावट आधारकार्ड वापरून विवाह करण्याचा प्रयत्न चाईल्डलाइन आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या सतर्कतेमुळे थांबवण्यात आला. बार्शीटाकळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या या गावात १७ वर्षीय मुलीचे २४ वर्षीय तरुणाशी लग्न होणार होते.
चाईल्डलाइन, ‘ॲसेस टू जस्टीस’ आणि I.S.W.S. या संस्थांच्या टीमने त्वरित धाडसी कारवाई करून विवाह रोखला. तपासात मुलीच्या आधारकार्डवरील वय १७ वर्ष असून ते वाढवून बनावट कार्ड तयार केलेले असल्याचे आढळले. टीमने पालकांना ग्रामपंचायत कार्यालयात आणून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ याबाबत माहिती दिली आणि बाल विवाहाचे दुष्परिणाम स्पष्ट केले.
नंतर प्रकरण अकोला बाल कल्याण समितीसमोर मांडण्यात आले, जिथे समुपदेशन आणि कडक इशारा देऊन दोन्ही पक्षांची बैठक झाली. उपस्थितांना अल्पवयीन मुलीचे लग्न केल्यास शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आयुष्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती देण्यात आली. पालकांनी कायदेशीर हमीपत्रावर मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही असा आशय लिहिला.
ही यशस्वी कारवाई बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, डॉ. विनय दांदळे, ॲड. शीला तोष्णीवाल, प्रांजली जयस्वाल, बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, चाईल्डलाइन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, कम्युनिटी सोशल पूजा मनवर आदींनी केली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे