
जळगाव, 30 मार्च (हिं.स.) शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल दिसून आला. आणि काही भागात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसत आहे. पुढचे काही तासात महत्वाचे असणार आहेत हवामान खात्यानं वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३० आणि ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात जोरदार वादळ, पावसासह गारपिटीचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. यादरम्यान वादळी वाऱ्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून उष्णतेच्या तडाख्याने लाहीलाही झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला. पण या अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पुढील काही तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसामुळे शेतीपिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर