
नंदुरबार, 30 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांच्या संकल्पनेनुसार राज्यातील 10 गावांना ‘मधाचे गाव’ म्हणून निवडण्यात आले असून, यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील बोरझर (ता. नवापूर) या गावाचा समावेश आहे. 27 मार्च 2026 रोजी प्रशिक्षित 30 लाभार्थ्यांना मध संकलन साहित्याचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी दिली.
रोजगार आणि पर्यटनाशी संबंधित या कार्यक्रमाला श्रीमती गीतांजली बाविस्कर आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती बाविस्कर यांनी सांगितले की, “‘मधाचे गाव’ उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. केवळ मध उत्पादनच नव्हे, तर पर्यटन क्षेत्रातही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.”
श्री. ठाकरे यांनी बोरझरच्या वनसंपत्तीचे कौतुक करत मध उद्योग वाढवण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे नमूद केले.
प्रशिक्षण आणि लाभार्थी निवड :-
बोरझर, उकळापाणी आणि प्रतापपूर येथील 30 मधपाळांची या योजनेसाठी निवड करण्यात आली होती. त्यांचे प्राथमिक प्रशिक्षण 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान पूर्ण झाले होते. कार्यक्रमात सर्व लाभार्थ्यांना आधुनिक मध साहित्य प्रदान करण्यात आले.
लाभार्थ्यांचे अभिप्राय आणि महिला प्रोत्साहन :-लाभार्थ्यांनी प्रशिक्षणामुळे मिळालेला अनुभव आणि कौशल्यांचे महत्त्व व्यक्त केले. पंचायत समिती सदस्या सौ. कातूताई गावीत यांनी महिला वर्गासाठी उपलब्ध योजनांची माहिती देण्याची विनंती केली, तर सरपंच सौ. रुंधा गावीत यांनी मधपाळांनी हे कौशल्य इतरांनाही शिकवावे, असे आवाहन केले.
सामूहिक सुविधा केंद्र आणि पर्यटन स्थळे :-
श्रीमती बाविस्कर व श्री. ठाकरे यांनी गावात उभारण्यात येणारे सामूहिक सुविधा केंद्र, ‘मधुबन’ आणि ‘सेल्फी पॉईंट’च्या जागेची पाहणी केली आणि कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश पाटील यांनी केले, तर यशस्वीतेसाठी राजेश गवांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर