
पालघर, 31 मार्च, (हिं.स.)। जिल्हा परिषद व महापालिका क्षेत्रातील, विशेषतः मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारने मार्च ते जून या कालावधीत व्यापक मोहीम हाती घेतली आहे. खासगी शाळांच्या वाढत्या स्पर्धेला तोंड देत सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी राज्यस्तरीय समितीच्या अहवालानुसार विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ हे विशेष अभियान गावपातळीवर राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जनजागृती केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांमधील स्मार्ट टीव्ही, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके आणि पोषण आहार या सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष गीताच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झाली आहे.
पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल लक्षात घेता, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ‘सेमी इंग्रजी’ वर्ग सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून शाळांविषयी विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या मोहिमेत स्थानिक प्रशासनालाही सहभागी करून घेतले असून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना स्थानिक करात सवलत देण्याच्या ‘करमाफी अभियान’ राबविण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे. ‘शिक्षणाची वारी’, ‘ग्रंथदिंडी’ आणि ‘चावडी वाचन’ यांसारख्या उपक्रमांतून गावागावांत शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे.
दरम्यान, ‘शाळा आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य घराघरांत जाऊन पालकांशी संवाद साधत आहेत. माता-पालक मेळाव्यांद्वारे आरोग्य, आहार व शिक्षणाबाबत जागरूकता वाढवण्यावर भर दिला जात असून प्रशासनाने या मोहिमेला व्यापक यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL