
सोलापूर, 01 एप्रिल (हिं.स.)।
अक्कलकोट रोडवरील शांतीधाम येथील दोन एकर जागा लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी ब्रह्ममठ होटगी संस्थेस देण्याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या नावे स्पष्ट पत्र दिले होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे हे महत्त्वाचे पत्र आयुक्तांपर्यंत पोहोचलेच नाही. यामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, आता एकच सवाल सर्वत्र विचारला जातं आहे.
प्रशासनात संशयाची साखळी
लोकप्रतिनिधींचे महत्त्वाचे पत्र थेट आयुक्तांपर्यंत न पोहोचणे ही केवळ चूक नसून, हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रकार असल्याची चर्चा रंगली आहे. काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा राजकीय दबावाखाली हे पत्र ‘दाबून’ ठेवले का, असा संशय व्यक्त केला जातोय.
ही बाब समोर आल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनातील अशा ‘आडमुठ्या’ आणि ‘बेजबाबदार’ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड