रत्नागिरी : तुटपुंज्या मदतीविरोधात आंबा-काजू शेतकरी एकवटले
रत्नागिरी, 1 एप्रिल, (हिं. स.) : राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये या दराने जाहीर केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असून या मदतीतून शेतकरी सावरणार नसल्याने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक दाखविण्यासाठी एकदिलाने व्
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आंबा काजू बागायतदार


रत्नागिरी, 1 एप्रिल, (हिं. स.) : राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये या दराने जाहीर केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असून या मदतीतून शेतकरी सावरणार नसल्याने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक दाखविण्यासाठी एकदिलाने व्यापक लढा उभारण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेतला.

एका बाजूला औषध फवारणी, खते, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च लाखांच्या घरात गेला असताना, सरकार केवळ २२ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचे समाधान करू पाहत आहे. एका आंबा बागेचा वार्षिक खर्च आणि झालेली हानी पाहता, ही रक्कम फवारणीच्या एका हप्त्यासाठीही पुरेशी नाही. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे कोकणचा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे.

राजकारणापलीकडे कोकणातील लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी आंबा व काजू बागायतदारांच्या प्रश्नावर मौन पकडले आहे. आंबा व काजू पीकविम्यामध्ये पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे. कर्जमाफीमध्येही निकष व अटी घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात आहे. यामुळे मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

येत्या ४ एप्रिल रोजी देवगड येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले.

या बैठकीस माजी आमदार बाळा माने, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे संचालक सुशांत नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, विनायक कदम, प्रकाश साळवी यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande