परभणी - स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीचं त्रांगडे मुख्यमंत्र्यांच्या दरबारात
भाजपची स्थानिक गटबाजी चव्हाट्यावर परभणी, 01 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी अंतर्गत स्थानिक नेतेमंडळींसह नवनिर्वाचित महापालिका सदस्यात एक वाक्यता न झाल्याने व गटबाजी उफाळून आल्याने महानगरपालिकेंतर्गत स्थायी समितीच्या तीन सदस्यांसह एका स्विकृत
स्विकृत सदस्यासह स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीचं त्रांगडे मुख्यमंत्र्यांच्या दरबारात : भाजप अंतर्गत स्थानिक गटबाजी चव्हाट्यावर


भाजपची स्थानिक गटबाजी चव्हाट्यावर

परभणी, 01 एप्रिल (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टी अंतर्गत स्थानिक नेतेमंडळींसह नवनिर्वाचित महापालिका सदस्यात एक वाक्यता न झाल्याने व गटबाजी उफाळून आल्याने महानगरपालिकेंतर्गत स्थायी समितीच्या तीन सदस्यांसह एका स्विकृत सदस्याच्या निवडी संदर्भातील प्रक्रिया पूर्णतः रखडली आहे. दरम्यान, स्थायी समितीचे सदस्य व स्विकृत सदस्याच्या निवडीचा विषय आता भाजपाच्या प्रदेशाध्यक्षापासून मुख्यमंत्र्यांच्या दरबारापर्यंत पोहोचला आहे.महानगरपालिकेच्या 18 मार्च रोजीच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्याच्या निवड प्रक्रियेवर शिक्कामोर्तब होईल, असे अपेक्षित होते. परंतु, या विशेष सभेतील स्विकृत सदस्याची निवड प्रक्रिया तांत्रिक बाबीचे कारण समोर करीत पुढे ढकलण्यात आली. परंतु, ती निवड प्रक्रियाच आता भाजप पक्षांतर्गत हेवेदाव्यांमुळे रखडली, असे चित्र समोर आले आहे. महापौर सय्यद इकबाल यांच्या अध्यक्षतेखाली त्या सभेत स्थायी समितीतील एकूण 13 सदस्यांच्या व 6 स्विकृत सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल, असे अपेक्षित होते. त्या पार्श्वभूमीवर गटनेत्यांकडून नियुक्त्यांबाबत नावांच्या अधिकृत याद्या, शिफारशी मागविण्यात आल्या होत्या. त्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कॉग्रेससह शहर विकास आघाडीच्या गटनेत्याने स्थायी समितीचे सदस्य व स्विकृत सदस्याच्या निवडी संदर्भात नावानिशी शिफारस पत्र दाखल केले. परंतु, भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याने केवळ स्विकृत सदस्याच्या नावाचे एक पत्र सादर करतेवेळी स्थायी समितीवरील भाजपाच्या कोट्याच्या 3 सदस्यांच्या नावांच्या शिफारशी बाबत पत्रच सादर केले नाही. त्यामुळेच महापौर सय्यद इकबाल हे चक्रावून गेले. भाजपकडून स्थायी समितीच्या सदस्याकरीता नाव न आल्याने महापौर सय्यद इकबाल यांनी त्या संबंधीच्या निवडीचा विषय प्रलंबित ठेवला अन् विशेष सभा त्या निर्णयाविना गुंडाळण्यात आली. स्थायी समितीसह स्विकृत सदस्यांच्या निवडीसह शिफारशी संदर्भात माशी कुठे शिंकली हे भाजपाच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी शोधण्यास सुरुवात केली तेव्हा महापालिकेंतर्गत नवनिर्वाचित सदस्य तसेच स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी अंतर्गत मतभिन्नतेसह गटबाजीमुळेच त्या संबंधी नावाच्या शिफारशीची यादीच समोर आली नाही, अशी धक्कादायक माहितीही उघडकीस आली. दरम्यान, स्विकृत सदस्य पदाकरीता भाजपाच्या गटनेत्या सौ. तिरुमला खिल्लारे यांनी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नावाच्या शिफारशीचे पत्र महापौर सय्यद इकबाल यांना सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावर भारतीय जनता पार्टीच्या 12 पैकी 11 सदस्यांनी त्या नावास विरोध करीत आक्षेप नोंदवला. तसेच स्थायी समितीच्या तीन सदस्यांच्याही नावाची शिफारसच केली नाही. भाजप अंतर्गत या हेवेदाव्यांमुळे व गटबाजीमुळेच या संबंधीची निवड प्रक्रिया पूर्णतः ठप्प झाली, असे दुर्देवी चित्र समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande