परभणीत ‘नारीवाद और नारी विमर्श’ राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात
परभणी, 01 एप्रिल (हिं.स.) : “नारी ही कधीच दुर्बल नव्हती, मात्र पुरुषप्रधान मानसिकतेमुळे तिला दुय्यम स्थान देण्यात आले आणि तिच्यावर अन्याय झाला,” असे ठाम प्रतिपादन इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठ, हैदराबाद येथील डॉ. प्रियदर्शनी यांनी केले. “नारीला
परभणीत ‘नारीवाद और नारी विमर्श’ राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात


परभणी, 01 एप्रिल (हिं.स.) : “नारी ही कधीच दुर्बल नव्हती, मात्र पुरुषप्रधान मानसिकतेमुळे तिला दुय्यम स्थान देण्यात आले आणि तिच्यावर अन्याय झाला,” असे ठाम प्रतिपादन इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठ, हैदराबाद येथील डॉ. प्रियदर्शनी यांनी केले. “नारीला माणूस म्हणून स्वीकारा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत आयोजित एक दिवसीय ‘नारीवाद और नारी विमर्श’ या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख मोहम्मद बाबर उपस्थित होते, तर उद्घाटनपर बीज भाषण डॉ. प्रियदर्शनी यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी इतिहास व पौराणिक ग्रंथांमधील स्त्रियांच्या शोषणाचे संदर्भ देत समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेवर भाष्य केले.

कार्यक्रमाची सुरुवात हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुजितसिंह परिहार यांच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी डॉ. उर्मिला पोरवाल, डॉ. राजश्री मोरे, डॉ. अरुणा शुक्ला, डॉ. सविता कीर्ते आणि डॉ. पल्लवी पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निर्मला जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दिपाली अवचार यांनी केले. या चर्चासत्रासाठी देशभरातील अनेक संशोधक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदी विभागातील डॉ. संतोष सोळंके, प्रा. आनंद लोखंडे, प्रा. सूर्यकांत चोरघडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विविध समित्यांमधून परिश्रम घेतले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande