
परभणी, 31 मार्च, (हिं.स.)। आमदार राजेश विटेकर यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादीचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन 2021 मध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या पेडगाव ग्रामपंचायतीतील कंत्राटी कर्मचारी स्व. प्रसाद बाबूराव गायकवाड यांच्या वारसांना तब्बल पाच वर्षांनंतर शासनाकडून 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.
29 मार्च 2026 रोजी पारित झालेल्या शासन निर्णयानुसार मयत कर्मचार्याच्या कुटुंबाला ही मदत देण्यात येणार आहे. या निर्णयाची प्रत राष्ट्रवादीचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या हस्ते संबंधित कुटुंबीयांना प्रदान करण्यात आली. यावेळी आमदार विटेकर यांनी दूरध्वनीवरून गायकवाड कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. मागील चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करून दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 29 मे 2020 च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून ही मदत मंजूर करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. या शासन निर्णयाची प्रत स्व. प्रसाद गायकवाड यांच्या पत्नी रुक्मिणीबाई प्रसादराव गायकवाड यांना सुपूर्द करण्यात आली.
यावेळी गायकवाड कुटुंबीयांसह पेडगावचे चेअरमन दिपक देशमुख, बाळासाहेब देशमुख, प्रा. रवी मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मुंजाभाऊ गायकवाड, उपसरपंच गोपाळ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दिपक देशमुख, पुरुषोत्तम देशमुख, चेतन देशमुख, अमोल देशमुख, फकीर गायकवाड, दिपक गायकवाड, श्रीरंग देशमुख, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग देशमुख, उद्धव गायकवाड, मधुकर गायकवाड, नितीन गायकवाड, संजय गायकवाड यांच्यासह गावकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis