रत्नागिरी : शिक्षकांनी विविध ऋणांची जाणीव ठेवावी - शोभा नाखरे
रत्नागिरी, 1 एप्रिल, (हिं. स.) : शिक्षकांनी समाजऋण, देवऋण व पितृऋणाची जाणीव ठेवावी, असे आवाहन राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लेखिका, निवेदिका व माजी मुख्याध्यापिका सौ. शोभा नाखरे यांनी केले. फाटक हायस्कूलचे संस्थापक गुरुवर्य कै. पुरुषोत्तम वासुदेव फ
शोभा नाखरे यांचे व्याख्यान


रत्नागिरी, 1 एप्रिल, (हिं. स.) : शिक्षकांनी समाजऋण, देवऋण व पितृऋणाची जाणीव ठेवावी, असे आवाहन राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लेखिका, निवेदिका व माजी मुख्याध्यापिका सौ. शोभा नाखरे यांनी केले.

फाटक हायस्कूलचे संस्थापक गुरुवर्य कै. पुरुषोत्तम वासुदेव फाटक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात “शिक्षक एक सामाजिक भान” या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या घटक संस्थांमधील सर्व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याध्यक्ष व फाटक गुरुजींची नात सौ. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी पुरुषोत्तम वा. फाटक गुरुजींच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची माहिती दिली. गुरुजींच्या पश्चातही त्यांची पत्नी रुक्मिणीबाई पुरुषोत्तम फाटक यांनीही ठामपणे भूमिका घेतल्याने आज शाळा सुरू आहे व शाळेने शतक महोत्सव साजरा केला आहे. फाटक गुरुजींचे कार्य लक्षात घेता आपण अशा शाळेत शिक्षक म्हणून करत असल्याने जबाबदारीने वागले पाहिजे, असे सांगितले.

आपल्या प्रभावी भाषणात नाखरे यांनी लोकमान्य टिळक आणि मदर तेरेसा यांच्या कार्याचा उल्लेख केला. मूठभर काम आणि ढीगभर ना घेण्याऐवजी निष्काम कर्म करणारे शिक्षक समाजाला घडवतात. शिक्षकांनी स्वतःपासूनच बदल घडवून आणावा, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहावे, नियमित योगाभ्यास करावा आणि झोपण्यापूर्वी दररोज पुस्तकाची किमान दहा पाने वाचनाची सवय लावावी. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आदर्श असतात. त्यांचा पेहराव, वर्तन, नम्रपणा आणि संस्कार यांचा विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव पडतो. शिक्षकांनी सकारात्मकता, स्वदेशीचा वापर आणि सोशल मीडियाचा योग्य उपयोग करावा. प्रेम दिले की ते शतपटीने आपल्याकडे परत येते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करावे, हटके विचार ठेवावेत आणि शब्दांची कंजूषी करू नये. योग्य ठिकाणी विद्यार्थ्यांचे कौतुक करावे.

स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याने अभ्यासाला चालना मिळते आणि सर्जनशीलता विकसित होते. त्यामुळे शिक्षकांनी नवीन प्रयोग करण्यास धाडस दाखवावे. इतर शिक्षकांनाही प्रोत्साहन देत सहकार्याची भावना जोपासावी. सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असून, सर्व शाळांची माहिती करून घेण्यासाठी शिक्षकांनी मुलाखती घेण्याची सवय लावावी, असेही त्यांनी सांगितले. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये लेखन करणे, आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करणे यांसारख्या माध्यमांतून आपले विचार मांडावेत. विशेष व सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या शाळांमध्ये सहभाग घेतल्याने अनुभव समृद्ध होतो. स्वतःच्या अडचणींनाही संधीमध्ये रूपांतरित करता येते, याची जाणीव करून देत समाजात व्यापक संपर्क वाढवणे गरजेचे असल्याचे सौ. शोभाताईंनी सांगितले.

यावेळी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, मुख्याध्यापक राजन कीर, उपाध्यक्ष सौ. सुमिता भावे, कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, उपकार्याध्यक्ष शेखर शेट्ये, सचिव राजीव गोगटे, सहसचिव शेखर लेले, गोपालकृष्ण नाखरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालक शिक्षक पत्रिकेचे ई-प्रकाशन अॅड. बाबासाहेब परुळेकर यांनी केले. शिक्षिका वृषाली दळी यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय शिक्षक अनिल आग्रे यांनी करून दिला. उपमुख्याध्यापक व्ही. व्ही. जोशी यांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande