महाराष्ट्रात हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग
अकोला, 31 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्रासह देशभरात लिम्फॅटिक फिलेरियासिस (हत्तीरोग) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला गती देण्यात येत आहे. आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या तीन औषधांच्या संयुक्त वापरातून य
महाराष्ट्रात हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग


अकोला, 31 मार्च (हिं.स.) :

महाराष्ट्रासह देशभरात लिम्फॅटिक फिलेरियासिस (हत्तीरोग) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला गती देण्यात येत आहे. आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या तीन औषधांच्या संयुक्त वापरातून या आजारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र शासनाने 2027 पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासन या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत असून विशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्तीरोगासारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय पुढाकार घेत आहे. 2017 मध्ये महाराष्ट्राने, विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या उपचारासाठी प्राधान्य देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.

५५ लाख नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट

राज्यात ‘मास ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए) मोहिमेद्वारे पात्र नागरिकांना दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जात आहेत. या मोहिमेत महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांचा समावेश असून, काही जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दोन औषधांऐवजी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’चा वापर केला जात आहे. ही पद्धत अधिक प्रभावी मानली जात असून कमी कालावधीत रोग नियंत्रणात आणण्यास मदत होते.

राज्यात सुमारे 55 लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागात या उपक्रमाचा मोठा फायदा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विदर्भात सर्वाधिक प्रादुर्भाव

महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, लातूर, धाराशिव, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, नांदेड, ठाणे, पालघर, नंदुरबार आणि यवतमाळ या 18 जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आढळतो. फेब्रुवारी 2026 च्या अहवालानुसार, राज्यातील सुमारे 75 टक्के रुग्ण एकट्या नागपूर विभागात आढळतात.

सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया यांचा समावेश आहे.

नागपूर ग्रामीणमध्ये यशस्वी परिणाम

‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) धोरणामुळे नागपूर ग्रामीण भागात लक्षणीय यश मिळाले आहे. 2014 मध्ये 4.91 टक्के असलेला सूक्ष्मजंतू प्रसार दर (एमएफ रेट) 2024 पर्यंत एक टक्क्यापेक्षा कमी करण्यात यश आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या उपचारामुळे मायक्रोफिलेरिया कमी करण्यास प्रभावी मदत होते, ज्यामुळे रोगाचा प्रसार वेगाने थांबवता येतो.

नागरिकांना आवाहन

राज्य शासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली औषधे घेण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय हत्तीरोग निर्मूलन शक्य नाही.

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande