पालघर - जलसारमध्ये 5 एकर जलाशयाला मंजुरी
पालघर, 31 मार्च, (हिं.स.) - सफाळे पश्चिम भागातील विटी लाईन परिसरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसार ग्रामपंचायत हद्दीत ५ एकर जागेवर जलाशय उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा
जलसारमध्ये 5 एकर जलाशयाला मंजुरी


पालघर, 31 मार्च, (हिं.स.) - सफाळे पश्चिम भागातील विटी लाईन परिसरातील भीषण पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसार ग्रामपंचायत हद्दीत ५ एकर जागेवर जलाशय उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून जलाशयाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

कांद्रेभुरे, गोरठण, दारशेतपाडा, खोडावेपाडा या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत विहिरी व बोअरवेल कोरड्या पडत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर जलसार ग्रामपंचायतीने पुढाकार घेत डिसेंबर २०२५ मध्ये ग्रामसभेत वनविभागाच्या म्हसणवट येथील ५ एकर जागेत जलाशय खोदण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.

सरपंच साक्षी गावड, उपसरपंच विंकोष म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने आता जलसार ग्रामपंचायत आणि शिवराय कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने जलाशयाचे काम हाती घेतले जाणार आहे.

दरम्यान, जून २०२६ पर्यंत जलाशयाचे काम पूर्ण झाल्यास सफाळे पश्चिम भागातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande