
जळगाव, 31 मार्च, (हिं.स.) - वणी येथील सप्तशृंगी गडाकडे पायी वारी करत असताना जिल्ह्यातील दोन भाविकांचा वेगवेगळ्या ठिकाणी भोवळ येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.परेश धर्मा पवार (वय १७, रा. चौगाव, ता. चोपडा) आणि राजेंद्र रामराव पाटील (४५, रा. जुवार्डी, ता. भडगाव) अशी या मृत भाविकांची नावे आहेत. या घटनेमुळे वारीत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.चोपडा तालुक्यातील चौगाव येथून पायी दिंडी सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना झाली होती.
ही कळवण तालुक्यातील भेंडी येथे पोहोचली असता भंडारा कार्यक्रमादरम्यान जेवणाच्या रांगेत उभा असलेल्या परेश पवार या युवकाला अचानक भोवळ आली. तो खाली कोसळल्यानंतर त्याला तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील राजेंद्र पाटील पालखीसोबत वणी गडाच्या दिशेने जात असताना मालेगाव तालुक्यातील शेरूळ परिसरात त्यांना अचानक भोवळ आली. त्यांना तातडीने उपचारासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर