
परभणी, 31 मार्च, (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथे नवीन आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी सुरू करण्यात आलेल्या साफसफाईदरम्यान बंजारा समाजाच्या झेंड्याची विटंबना झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद न झाल्याने संतप्त बंजारा समाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबला. अंबरवाडी गावातील जुने उपआरोग्य केंद्र मोडकळीस आल्याने शासनाकडून नवीन इमारतीस मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अंबरवाडी तांड्यावर नवीन इमारत उभारण्यासाठी सोमवारी सकाळी आठ वाजता जागेची साफसफाई सुरू करण्यात आली. यावेळी बंजारा समाजाच्या झेंड्याची विटंबना झाल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
घटनेनंतर मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे नागरिक बामणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र ही घटना शासकीय जागेवर घडल्याचे कारण देत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे संतप्त महिला-पुरुषांनी पुन्हा घटनास्थळी जाऊन आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी प्रशासनासमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. झेंड्याच्या विटंबनेप्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करावा, संबंधित जागा संत सेवा लाला महाराज व जगदंब माता मंदिरासाठी बंजारा समाजाच्या नावे करावी, तसेच शासनाच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी जुने उपआरोग्य केंद्र आहे त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारावी, अशी मागणी करण्यात आली. कंत्राटदार मनमानी पद्धतीने सदर जागेवरच बांधकाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. प्रशासनाने त्वरित मागण्या मान्य केल्या नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात बंजारा समाज तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
दरम्यान, अंबरवाडी गावात बंजारा समाजाचे आंदोलन सुरू होते. दरम्यान, आंदोलनस्थळी कोणताही प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी फिरकला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis