अमरावती - मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा
अमरावती, 31 मार्च (हिं.स.) मेळघाटमधील माता, बालमृत्यूसोबतच कुपोषणाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्ययंत्रणेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये अधिक गतीमानता आणावी तसेच झालेल्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नये, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा


अमरावती, 31 मार्च (हिं.स.) मेळघाटमधील माता, बालमृत्यूसोबतच कुपोषणाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्ययंत्रणेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये अधिक गतीमानता आणावी तसेच झालेल्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नये, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिले. मेळघाटातील कुपोषणासह बाल व मातामृत्यू रोखण्यासंदर्भात सीईओंच्या अध्यक्षतेखाली आज जि. प.च्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार, डॉ. हर्षल क्षीरसागर, डॉ. संदीप हेडाऊ यांच्यासह मेळघाटमधील अनेक डॉक्टर्स उपस्थित होते. माता व बालमृत्यूची कारणे शोधून काढून ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याबाबत सीईओंनी मार्गदर्शन केले. शिवाय झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, असा सज्जड इशारासुद्धा त्यांनी दिला. यावेळी मेळघाटमधील चिकित्सक तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुपोषणासह बाल व मातामृत्यूची सद्यःस्थिती विषद केली.

आता दरमहा आढावा मेळघाटातील कुपोषण, बाल व मातामृत्यूबाबतची आढावा बैठक यापुढे दर महिन्याला आयोजित करण्यात येईल. तसेच या सभेत मेळघाटातील या गंभीर प्रश्नांबाबत काय उपाययोजना केल्यात याची माहिती सीईओ जाणून घेणार आहेत. त्यामुळे आता दरमहा जिल्हा परिषदेत मिशन मेळघाटवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande