
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील नदी व नाल्यांच्या काठावरील अतिक्रमणे तत्काळ हटविण्याची कारवाई सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त श्रीकांत यांनी दिले आहेत. विशेषतः नारेगाव परिसरातील नदीकाठावरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याने ते प्राधान्याने हटवावे, असेही त्यांनी सांगितले.
मनपा आयुक्तांनी स्मार्ट सिटी कार्यालयात नालेसफाइच्या कामांबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे, शहर अभियंता संजय कोंबडे, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तानपुरे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी व सचिन वायकर यांसह विभागीय वॉर्ड अभियंते उपस्थित होते.
आयुक्तांनी निर्देश दिले की, येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईचे काम १ एप्रिलपासून सुरू करावे. नदीची सीमा निश्चित करून तिचे रेखांकन करावे. सीमा निश्चित करताना रेल्वे कामात वापरण्यात येणारे मजबूत स्लीपर किंवा खांब वापरावेत, जेणेकरून ते सहज काढता येणार नाहीत.
शहरातील सर्व दहा झोनमध्ये नालेसफाईचे सूक्ष्म नियोजन करावे, तसेच नालेसफाई करताना वरच्या टोकापासून खालच्या दिशेने सफाई करावी, जेणेकरून गाळ साचण्याची समस्या टाळता येईल. मागील वर्षी राहूल नगर, इटखेडा व नारेगाव या भागात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानुसार यावर्षी पूर निर्माण होण्याची मूळ कारणे शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले.
भविष्यात पूरामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी काटेकोर नियोजन करावे, तसेच नालेसफाई दरम्यान दररोज किती मीटर सफाई झाली याचा अचूक अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis