छ. संभाजीनगर - एकलहेरा येथे लक्ष्मीमाता यात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च, (हिं.स.)। एकलहेरा येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी माता यात्रेला शुक्रवार (दि.३) पासून मोठया उत्साहात प्रारंभ होत आहे. प्रतिवर्षी भरणारा हा पारंपरिक, धार्मिक यात्रा उत्सव यंदाही भक्तिभावाने साजरा होणार आहे. येथील लक्ष्मीमा
छ. संभाजीनगर - एकलहेरा येथे लक्ष्मीमाता यात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ


छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च, (हिं.स.)। एकलहेरा येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी माता यात्रेला शुक्रवार (दि.३) पासून मोठया उत्साहात प्रारंभ होत आहे. प्रतिवर्षी भरणारा हा पारंपरिक, धार्मिक यात्रा उत्सव यंदाही भक्तिभावाने साजरा होणार आहे.

येथील लक्ष्मीमाता ही भाविकांना नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रेनिमित्त मोठया संख्येने भाविक दर्शन व नवस फेडण्यासाठी येतात. यात्रेदरम्यान दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी भाविक आपापले नवस पूर्ण करतात. दरम्यान, सायंकाळी आकर्षक नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. यामुळे यात्रेचे वातावरण अधिक रंगतदार ठरते. पहिल्या दिवशी भाविक बोकड, कोंबड्यांचा बळी देऊन, दुपारी बारा गाड्या ओढून आपापले नवस फेडतात. तर रात्री नाटकं सादर होतात. तसेच दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल, पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर मध्यरात्री बारा वाजता लक्ष्मीमाता मूर्तीची मिरवणूक काढण्यात येते.

या यात्रा उत्सवाचा परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन गावकरी, यात्रा उत्सव समिती व कबड्डी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष योगेश गांगर्डे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande