पालघर - खोडाळ्यात दूषित पाणीपुरवठा कायम; ग्रामस्थ संतप्त
पालघर, 31 मार्च, (हिं.स.)। मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावात मागील अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठ्याची समस्या कायम असून ग्रामस्थांना अशुद्ध पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून जलशुद्धीकरणाबाबत ठोस उपाययोजना
खोडाळ्यात दूषित पाणीपुरवठा कायम


पालघर, 31 मार्च, (हिं.स.)। मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावात मागील अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठ्याची समस्या कायम असून ग्रामस्थांना अशुद्ध पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून जलशुद्धीकरणाबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गावात सुमारे पाच लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र असूनही त्याची नियमित देखभाल होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. केंद्रात साचलेला कचरा व घाण वेळोवेळी साफ न केल्याने पाणी दूषित होत असून गेल्या तीन वर्षांपासून शुद्ध पाणीपुरवठा झालेला नाही, अशी तक्रार आहे.

दरम्यान, ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत काही काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता; मात्र तो तात्पुरताच ठरल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी खर्च होत असतानाही प्रत्यक्षात बहुतांश गावांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. सुमारे २४१ कोटी रुपयांची थकबाकी असल्याने ठेकेदारांनी कामे थांबविल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे पाणीप्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

खोडाळा ग्रामपंचायत क्षेत्रासाठी विद्यमान जलकुंभांना ‘जल जीवन’ योजनेची जोडणी केल्यास शुद्ध पाणीपुरवठा शक्य होईल, अशी माहिती ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande