
अमरावती, 31 मार्च (हिं.स.)। वनप्रशिक्षण संस्थेच्या हरियाल सभागृहात वनरक्षकांच्या मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या ६३व्या सत्राचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक नीता कट्टे, वन्यजीव विभाग, परतवाडा होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी अनंता डिगोळे, चिखलदरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेख अब्दुल तसेच वन प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका मुक्ताबाई टेकाळे व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
समारंभाच्या प्रारंभी प्रशिक्षणार्थ्यांची पासिंग आऊट परेड झाली. परेडचे निरीक्षण उपवनसंरक्षक नीता कट्टे यांनी स्वीकारले. यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी योग, कराटे तसेच विविध मैदानी कवायतींचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. संचालिका मुक्ताबाई टेकाळे यांनी प्रशिक्षण सत्राचा आढावा सादर करताना सांगितले की, राज्यातील धुळे,अलिबाग, सावंतवाडी, नाशिक, नंदुरबार, सातारा व कोल्हापूर वन विभागांतील एकूण ४७ प्रशिक्षणार्थीनी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून सर्वजण यशस्वी ठरले. यापैकी २६ प्रशिक्षणार्थीनी प्राविण्य श्रेणी मिळवली.
विषयानुसार सर्वोच्च गुण मिळवणाऱ्यांमध्ये करुणा पाडकी, श्रेयश राय, बाबुराव आढळ, संतोष पाटील व साहिल थोरात यांचा समावेश आहे. क्रीडा प्रकारातही प्रशिक्षणार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. पाच किमी धावण्याच्या पुरुष गटात सचिन चौरे प्रथम,अभिजीत कारले व साजन पवार यांनी अनुक्रमे पुढील क्रमांक मिळवले; तर महिला गटात विजया वसावे, प्रियंका पावरा व अश्विनी पावरा यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल व बास्केटबॉल या खेळांमध्येही प्रशिक्षणार्थ्यांनी कौशल्य दाखवत प्रमाणपत्रे प्राप्त केली.
प्रमुख पाहुणे अनंता डिगोळे यांनी विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सेवेसाठी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात नीता कट्टे यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करताना जंगल व निसर्ग संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. सहा महिन्यांचे प्रशिक्षण हे त्यांच्या सेवाजिवनातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी यांनी केले, तर कवायत प्रशिक्षक सुधीर आखेवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुरुषोत्तम शर्मा सोळंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी