
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च (हिं.स.) : रेल्वे गाड्या व स्थानकांवर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या संयुक्त कारवाईदरम्यान एकूण ३५ अनधिकृत विक्रेते आढळून आले असून, त्यांच्याकडून १३ हजार ८६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. संबंधितांवर रेल्वे नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात आली आहे.
प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि नियमानुसार सेवा उपलब्ध करून देणे तसेच अनधिकृत विक्रीला आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. वाणिज्य निरीक्षक आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी विविध मार्गांवर तपासणी करत ही कारवाई केली.
या मोहिमेत छत्रपती संभाजीनगर, वाशीम, अकोला, परभणी, परतूर, परळी, जालना, नांदेड, आदिलाबाद आणि मनमाड या विभागांचा समावेश होता.
दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत. तसेच रेल्वे स्थानके व गाड्यांमध्ये स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis