वसई-विरार महापालिकेचा कारभार पूर्णपणे डिजिटल करण्याची मागणी
पालघर, 31 मार्च, (हिं.स.)। वसई-विरार शहर महापालिकेचा कारभार पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी तो पूर्णपणे डिजिटल करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी महासभेत केली. अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टी
वसई-विरार महापालिकेचा कारभार पूर्णपणे डिजिटल करण्याची मागणी


पालघर, 31 मार्च, (हिं.स.)। वसई-विरार शहर महापालिकेचा कारभार पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी तो पूर्णपणे डिजिटल करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी महासभेत केली. अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका करत महसुलातील तूट आणि वाढता खर्च याकडे लक्ष वेधले.

महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे ९५ कोटी रुपयांची तूट असल्याचे सांगताना पाटील यांनी वीजखर्चावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे नमूद केले. योग्य नियोजन व अंमलबजावणी केल्यास हा खर्च सुमारे ३० कोटींवर आणता येऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. यामुळे महसुलावरील ताण कमी होऊन विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिवहन सेवा आणि बाजार कर वसुलीत होणाऱ्या गैरप्रकारांवरही त्यांनी बोट ठेवले. डिजिटल पावती प्रणाली सुरू करून ‘जीपीएस’ आधारित व्यवहार राबविल्यास बोगस वसुलीला आळा बसेल, असे त्यांनी सांगितले. तसेच छोटे विक्रेते आणि आदिवासी बांधवांसाठी सवलतीचे दर लागू करण्याची सूचनाही त्यांनी केली.

नगरसेवक आणि नागरिकांना माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र लॉगिन प्रणाली विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सर्व विभागांची कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून आरोग्य व बांधकाम विभागांचे डॅशबोर्ड तयार करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

पुढील पाच वर्षांत वसई-विरार महापालिका देशातील सर्वात पारदर्शक व डिजिटल पालिका बनावी, असा रोडमॅप तयार करण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande