
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च (हिं.स.)। पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राजा बागसवार यांचा वार्षिक उरूस उत्साहात पार पडला. मानाच्या कावडीने सुरू झालेल्या या यात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.
गोदावरीच्या पवित्र जलाचा अभिषेक केल्यानंतर संदल मिरवणूक काढण्यात आली. मुख्य उरुसानिमित्त छबिना मिरवणूक काढण्यात आली, ज्यात बॅण्ड आणि ढोल ताशांच्या पथकांनी रंगत आणली. भाविकांनी दर्गा परिसरात बोकडांचे कंदुरी व गोड भाताचा (न्याज) नैवेद्य दाखवूननवस फेडले. धार्मिक कार्यक्रमांसोबतच भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
जंगी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली. शेवटची कुस्ती ऋतिक राजपूत (धुळे) व सागर कोल्हे (शेवगाव) यांच्यात बरोबरीत सुटल्याने बक्षीस विभागून देण्यात आले. कव्वालीच्या मुकाबल्याने या उरूस सोहळ्याची सांगता झाली.
उरुसाच्या यशस्वीतेसाठी दर्गा पुजारी पठाण व शेख परिवारासह ग्रामपंचायत अधिकारी अर्जुन थोरात, जि.प. सदस्या राधिका जगताप यांच्यासह उरूस कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे, उपनिरीक्षक कविता जगताप आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis