
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक मे महिन्याच्या अखेरीस होणार आहे. जिल्ह्यातील ७०९ कृषी आणि ८४९ बिगरशेती सहकारी संस्थांकडून मतदान प्रतिनिधी निवडण्यासाठी येत्या ९ एप्रिलपर्यंत ठराव मागवले आहेत. त्यानंतर मतदारयादी तयार केली जाणार असल्याची माहिती सहकार सहनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून संचालकांच्या तालुकानिहाय प्रत्येकी एक या प्रमाणे ९ जागा निवडल्या जातील. छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांतून हे
संचालक निवडले जातील. जिल्ह्यात ७०९ कृषी पतपुरवठा संस्था आहेत. या संस्था आपला मतदान प्रतिनिधी निवडतील. त्यासाठी ग्रामीण भागात चुरस निर्माण झाली आहे.
बिगर शेती संस्था मतदारसंघातून पाच संचालकांची निवड केली जाईल. दुग्ध व्यवसाय संस्था, कुक्कुट पालन संस्था, शेळी-मेंढी पालन संस्था, नागरी सहकारी बँका, नागरी पतसंस्था, पगारदार नोकरांच्या पतसंस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था आदींचे प्रतिनिधी त्यासाठी मतदान करतील. कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया संस्था, वैयक्तिक सभासद मतदारसंघ, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून प्रत्येकी १, तर महिला प्रतिनिधी म्हणून २ संचालकांची निवड केली जाईल.
बँक तयार करणार मतदार यादी
कृषी, बिगर शेती संस्थांकडून मतदान प्रतिनिधी निवडून जिल्हा बँकेक डे ठराव सादर करावा लागणार आहे. आपल्या ठरावानुसार बँक तात्पुरती मतदारयादी तयार करून सहकार सहनिबंधकांकडे पाठवेल. या यादीवर आक्षेप घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत असेल. आक्षेपांवरील सुनावणीनंतर अंतिम मतदारयादी तयार केली जाईल. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम मतदारयादी तयार करून याच महिन्याच्या अखेरीस संचालक मंडळाची निवडणूक घेतली जाईल.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis