महसूल आयुक्तालय नांदेडलाच करण्याची मराठवाडा लोकविकास समन्वय संघर्ष समितीची मागणी
नांदेड, 31 मार्च (हिं.स.)। नांदेड येथे महसूल आयुक्तालय तातडीने सुरू करावे तसेच इतर प्रलंबित जनहिताच्या मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी जनआंदोलन छेडण्याचा निर्णय मराठवाडा लोकविकास समन्वय संघर्ष समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. बैठकीत नांदेड तहसील
महसूल आयुक्तालय नांदेडलाच करण्याची मराठवाडा लोकविकास समन्वय संघर्ष समितीची मागणी


नांदेड, 31 मार्च (हिं.स.)। नांदेड येथे महसूल आयुक्तालय तातडीने सुरू करावे तसेच इतर प्रलंबित जनहिताच्या मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी जनआंदोलन छेडण्याचा निर्णय मराठवाडा लोकविकास समन्वय संघर्ष समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत नांदेड तहसील व महापालिकेचे विभाजन करून उत्तर व दक्षिण असे २ स्वतंत्र प्रशासकीय कार्यालये स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नांदेड जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे. समितीने शासनाला १५ ऑगस्ट २६ पर्यंतचा अवधी दिला असून, त्यानंतर जनजागरण, धरणे व उपोषणासारख्या आंदोलनाचा अवलंब करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांतील नागरिकांना छोट्या-मोठ्या कामांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. तसेच नांदेड हे मुख्य रेल्वे मार्गावर असल्याने लातूर जिल्ह्यालाही यामध्ये सहज समाविष्ट करता येऊ शकते, असे समितीने नमूद केले आहे. तसेच मराठवाडा व विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीचा प्रश्न दीर्घकाळ केंद्र व राज्य स्तरावर प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचेही सांगण्यात आले.

समितीने कामकाजासाठी स्थायी समिती गठीत केली असून त्यात विजय जोशी बारुळकर, डी.एम. पाटील, माधव पाटील तरोडेकर, माणिक डहाळे, कमलाकर जोशी, जगन पांचाळ, कृष्णा उमरीकर, सखाराम कुलकर्णी, राजकमल बाकलीवाल, शिवकांत स्वामी, एच. आर. पेद्देवाड, के. के. जांबकर यांचा समावेश आहे. बैठकीस राजेश माने, शिवाजी कंठाळे, ज्ञानोबा वाघमारे, नारायण घोगरे, रामेश यन्नावार, रंगनाथ सरदेशपांडे, र. ब. दुडके व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थान पु.गो. नाईक यांनी भूषविले. सूत्रसंचालन बंडोपंत कुंटुरकर यांनी केले. मुख्य समन्वयक के. के. जांबकर यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले. यावेळी महावितरण, महापालिका, जनआरोग्य अभियान तसेच शहर विकासाशी संबंधित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. एप्रिलमध्ये संबंधित विभागांनी नियमित आढावा बैठका घेऊन जनतेच्या मागण्यांवर कार्यवाही करावी, असा ठरावही संमत करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande