पालघर - सफाळे येथे ७ एप्रिलला कुर्लाई देवीची भव्य यात्रा
पालघर, 31 मार्च (हिं.स.)। सफाळे गावाची ग्रामदेवता असलेल्या कुर्लाई देवीची वार्षिक यात्रा चैत्र पंचमी, शके १९४८ अन्वये मंगळवार, ७ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. गेल्या ६७ वर्षांची परंपरा जपत हा यात्रोत्सव यंदाही भक्तिभाव आणि जल्लोषात प
सफाळे येथे ७ एप्रिलला कुर्लाई देवीची भव्य यात्रा


पालघर, 31 मार्च (हिं.स.)। सफाळे गावाची ग्रामदेवता असलेल्या कुर्लाई देवीची वार्षिक यात्रा चैत्र पंचमी, शके १९४८ अन्वये मंगळवार, ७ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. गेल्या ६७ वर्षांची परंपरा जपत हा यात्रोत्सव यंदाही भक्तिभाव आणि जल्लोषात पार पडणार असल्याने पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गावांमधून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी सफाळ्यात दाखल होणार आहेत. विविध जाती-धर्मातील नागरिक एकत्र येत या यात्रेत सहभागी होतात, ही या उत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख मानली जाते. संकटाच्या काळात असो वा आनंदाच्या प्रसंगी, कुर्लाई देवीच्या जत्रेमुळे गावकऱ्यांमध्ये ऐक्य आणि श्रद्धेची भावना अधिक दृढ होते.

श्री ग्रामदेवी कुर्लाई विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यात्रोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. दिवसभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ४ वाजता देवीची पालखी उत्साहात काढण्यात येणार आहे.

इतिहासाच्या दृष्टीनेही या मंदिराला विशेष महत्त्व आहे. शेकडो वर्षांपूर्वी कुर्लाई मातेचे वास्तव्य सरतोड येथे होते. त्यानंतर कै. गोविंद रानडे, विठ्ठल घरत, भाऊ पाटील, माधव पाटील व गोविंद घरत यांच्या पुढाकाराने सफाळे येथे मंदिराची उभारणी करण्यात आली. सध्या मंदिर परिसरात विविध लहान मंदिरे, स्वच्छता सुविधा, कमान व बगीचा यांसारख्या सोयी उपलब्ध आहेत.

दरम्यान, हनुमान जयंतीनिमित्त २ एप्रिल रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande