
परभणी, 31 मार्च, (हिं.स.)। ग्रामीण महाराष्ट्राचा आरोग्यदृष्ट्या कायापालट करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले असून, या राज्यव्यापी उपक्रमाची सुरुवात १ एप्रिलपासून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने १० फेब्रुवारी रोजी या योजनेला मान्यता दिल्यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्रारंभ होत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबवली जाणार आहे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजवणे, स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पोषण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच संसर्गजन्य आजारांबरोबरच जीवनशैलीशी संबंधित आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य या विषयांनाही अभियानात स्थान देण्यात आले आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावरील सर्व यंत्रणा सक्रिय सहभागी होणार असून, लोकसहभागातून आरोग्य चळवळ उभी करण्याचा सरकारचा मानस आहे.
‘आरोग्यसंपन्न गाव’ किताबासाठी स्पर्धा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा आणि गाव पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ठरवलेल्या निकषांनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. अशा गावांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जाईल.या योजनेसाठी राज्य सरकारने ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य केंद्रे आणि गावांना कोट्यवधी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
कोट्यवधींची पारितोषिके जाहीर राज्य स्तरावर जिल्हा परिषदांना अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी आणि २ कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. पंचायत समित्यांसाठीही २ कोटी, १.५ कोटी आणि १.२५ कोटी रुपयांचे पुरस्कार निश्चित करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपआरोग्य केंद्रांनाही स्वतंत्र पुरस्कार देण्यात येणार आहेत. गाव स्तरावर उत्कृष्ट ठरणाऱ्या गावांना जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर अनुक्रमे २५ लाख, १ कोटी आणि ५ कोटी रुपयांपर्यंतची पारितोषिके मिळणार आहेत.दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत हे अभियान राबवले जाणार असून, प्रत्येक गावाला आरोग्य क्षेत्रात सुधारणा करून पुरस्कार मिळवण्याची संधी मिळणार आहे.ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, यातून सुदृढ आणि निरोगी समाज घडण्यास मोठी मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis