गॅस बुकिंग मुदतवाढीचा फटका; जव्हारमध्ये संताप वाढला
पालघर, 31 मार्च, (हिं.स.)। केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळालेल्या गॅस जोडण्यांचा लाभ घेत असलेल्या जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सध्या गॅस बुकिंगच्या वाढीव मुदतीचा मोठा फटका बसत आहे. पूर्वी ३० दिवसांत मिळणारा गॅस सिलिंडर आ
गॅस बुकिंग मुदतवाढीचा फटका; जव्हारमध्ये संताप वाढला, आंदोलनाचा इशारा


पालघर, 31 मार्च, (हिं.स.)। केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळालेल्या गॅस जोडण्यांचा लाभ घेत असलेल्या जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सध्या गॅस बुकिंगच्या वाढीव मुदतीचा मोठा फटका बसत आहे. पूर्वी ३० दिवसांत मिळणारा गॅस सिलिंडर आता ४५ दिवसांनी मिळत असल्याने महिलांच्या स्वयंपाकघरात अडचणी वाढल्या आहेत.

युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे कारण देत ही मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागात पाच सदस्यांच्या कुटुंबाला एक सिलिंडर ३० दिवसही पुरत नसताना ४५ दिवसांची प्रतीक्षा करणे कठीण असल्याची तक्रार महिलांकडून व्यक्त होत आहे. ही मुदत २५ दिवसांवर आणावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून केली जात आहे.

जव्हार तालुक्यात बहुसंख्य नागरिक ग्रामीण भागात राहतात. सध्या गॅसअभावी अनेक गावांमध्ये पुन्हा पारंपरिक इंधनाचा वापर वाढू लागला आहे. सणासुदीचा काळ, धार्मिक कार्यक्रम आणि गावोगावी सुरू असलेल्या यात्रांमुळे गॅसची मागणी वाढली असताना पुरवठा मात्र अपुरा ठरत आहे. परिणामी गॅस एजन्सीसमोर दररोज पहाटेपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

तासनतास प्रतीक्षा करूनही वेळेवर गॅस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गॅस पुरवठ्याचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास तहसील कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सरपंचांसह संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. संदीप माळी, अजय डोके, किशोर जाधव, गणेश वाळवी, सचिन चव्हाण आदींनी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande