नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले
नांदेड, 31 मार्च (हिं.स.) । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मतदानाचा अधिकार निश्चित करण्यासाठी सेवा सहकारी सोसायट्यांच्या बैठका घेतल्या जात असून विविध ठराव पारित
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले


नांदेड, 31 मार्च (हिं.स.) । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मतदानाचा अधिकार निश्चित करण्यासाठी सेवा सहकारी सोसायट्यांच्या बैठका घेतल्या जात असून विविध ठराव पारित केले जात आहेत.

गणपूर येथील सेवा सहकारी सोसायटीच्या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा बाजार समितीचे माजी सभापती बी. आर. कदम यांच्या नावाचा बिनविरोध ठराव मंजूर करण्यात आला. तसेच भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व संचालक गणपतराव तिडके यांच्या नावाचाही ठराव एकमताने पारित झाला. हे दोन्ही नेते जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, कोंढा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या ठरावादरम्यान बँकेचे विद्यमान संचालक बाबूराव कदम कोंढेकर यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडत स्वतःच्या नावाचा ठराव मंजूर करून घेतला.

निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून प्रत्येक तालुक्यातून एक संचालक निवडला जातो. प्रत्येक सेवा सहकारी सोसायटीला एक मताचा अधिकार असून, त्या अनुषंगाने कोणाला मतदानाचा अधिकार द्यायचा यासाठी ठराव घेतले जात आहेत. त्यामुळे सोसायट्यांमधील ठरावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

गणपूरमधील ठरावामुळे बी. आर. कदम आणि गणपतराव तिडके यांच्यातील स्पर्धा अधोरेखित झाली आहे. दोघेही सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते असून खासदार अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे अंतिम निवडीसाठी या दोघांपैकी एकाच्या नावाचा विचार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande