खानदेशात गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात
धुळे, 31 मार्च, (हिं.स.) | खानदेशात रब्बी हंगामातील गव्हाची काढणी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बहुतांश शेतांमधील कापणी पूर्ण होत आली असली तरी बाजारपेठेतील घसरणारे दर आणि खरेदीतील मंदीमुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. गहू आणि मक्यासारख्या पिकांना
खानदेशात गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात


धुळे, 31 मार्च, (हिं.स.) | खानदेशात रब्बी हंगामातील गव्हाची काढणी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बहुतांश शेतांमधील कापणी पूर्ण होत आली असली तरी बाजारपेठेतील घसरणारे दर आणि खरेदीतील मंदीमुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. गहू आणि मक्यासारख्या पिकांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने नाराजी वाढताना दिसत आहे.

या आठवड्याभरात काढणी पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना, शेतकऱ्यांच्या घरात गहू पोहोचला असला तरी विक्रीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक बाजार समित्या बंद असल्याने आणि उघड्यावर साठवलेल्या धान्यावर अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंजाबमधून मोठ्या संख्येने हार्वेस्टर यंत्रे खानदेशात दाखल झाली होती. मात्र काढणी संपत आल्याने ही यंत्रे आता परतू लागली आहेत. आतापर्यंत सुमारे दोनशे हार्वेस्टर पंजाबकडे रवाना झाले असून उरलेली यंत्रेही पुढील काही दिवसांत परत जाण्याची शक्यता आहे.

यंदा काही ठिकाणी हार्वेस्टरद्वारे काढणीसाठी प्रतिएकर 1500 ते 1700 रुपये खर्च आला. उत्पादन सरासरीप्रमाणे झाले असले तरी दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षी गव्हाला 2600 ते 2800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता, तर यंदा तोच गहू 2100 ते 2200 रुपयांदरम्यान विकला जात आहे. म्हणजेच सुमारे 500 ते 600 रुपयांची घसरण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande