
सोलापूर, 31 मार्च (हिं.स.)। नान्नज येथे सुमारे ३०० वर्षांपासून सुरू असलेली लालूबाईची यात्रा यंदाही पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली, अशी माहिती गोपाळ (डोंबारी) समाज बांधवांनी दिली. तसेच बिबीदारफळ येथे श्री सयाजी बाबा व श्री वंधारी माता यात्राही धार्मिक विधींनी संपन्न झाली.
स्थानिक आख्यायिकेनुसार, सुमारे तीनशे वर्षांपूर्वी लालूबाई ही २२ वर्षीय तरुणी गावोगावी तारेवरील कसरत सादर करत होती. नान्नज येथे तिने दोन महिने कला सादर केल्यानंतर, “याच ठिकाणी माझा देहांत होईल,” अशी पूर्वसूचना दिली. त्यानंतर तिच्या इच्छेनुसार येथे समाधी उभारून मंदिर स्थापन करण्यात आले. तेव्हापासून दर तीन वर्षांनी गुढी पाडव्यापासून नान्नज-बिबीदारफळ मार्गालगत लालूबाई यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह सातारा, सोलापूर, बारामती तसेच कर्नाटकातून मोठ्या संख्येने डोंबारी समाज बांधव हजेरी लावतात. वेळापूर, अकलूज आदी भागांतून आलेल्या सुमारे ४ ते ५ हजार भाविकांनी यात्रेत सहभाग नोंदवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड